संघर्ष उद्याचा

      किर्र रात्र, रातकिडे ओरडत होते.. जणू काही तरी सांगायचा प्रयत्न करत असावे. सृष्टीतल्या त्या भयानक सत्या बद्दल तर बोलायचं नसेल ना त्यांना? उद्यासाठी काय वाढून ठेवलंय ?एवढा विचार कधीही न करणारा राकेशही विचारात गुंग झाला होता. कितीतरी वेळ असाच गेला अबोल्यात म्हणूया. जेव्हा प्रेयसी  सोबत असूनही प्रियकराकडे काहीच लक्ष देत नाही तेव्हा अचानकपणे प्रियकराने तिला चिमटा घ्यावा आणि तिने मग लागलीच रागात त्याच्याशी संवाद साधावा.. असंच झालं.. दिव्यापुढे बसलेला राकेश त्याच्या गुंगीतून जागा झाला तो पतंगाच्या झेपेने. प्रकाशाकडे धावताना तो पतंग त्याच्या चेहऱ्यावर येऊन धडकला आणि राकेश वर्तमानात परतला. कालपर्यंत कामाचा आनंद घेत जगत होता. आजच्या पुरत काम कराव उद्याचं उद्या बघू अशा प्रवृत्तीचा तो. दुसऱ्यांसाठी व्यवहारी ज्ञान नसलेला असेल; पण गरजेपुरतं कमवावं आणि खावं या भारतीय संस्कृतीच जतन करणारा खरा माणूस होता तो..पण! खरंच तुम्हाला संस्कृती जगवते का?कि खोट्या स्वप्नांच्या मागे धावून कमावलेलं इस्पितचं तुम्हाला जगवते हि बघण्याची कसोटी होती...आता पुढे काय वाढून ठेवलंय ते देवालाच माहित होते.
         राकेश एका छोट्याशा खेड्यातून मोठी स्वप्न घेऊन शहराकडे आलेला चाळिशीकडे झुकलेला काटक प्रौढ. परिस्थितीच्या खस्ता खाऊन असेल म्हणूनच की काय, आजही विशीतल्या मुलासारखं कोठेही मांस न सोडलेलं त्याचं शरीर... डोळे खोल गेलेले, गाल बसलेले आणि भट्टीतून बाहेर काढलेल्या लोखंडासारखा करपलेला चेहरा.. एखाद्या झाडाला पाणीच मिळू नये आणि तरीही माळरानावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बाभळीच्या झाडाची आठवण व्हावी असंच जणू काही.....
              आज खरा तर तो सुन्न झाला होता.झोपेतल्या माणसाला उठायला लावणारी महामारीने शहरेही निद्रिस्त होऊ पाहत असताना त्याची झोप रात्रीच्या काळोखात गडप झाली होती.. सावकाराकडे गहाण ठेवलेली जमीन परत मिळवावी म्हणून अहोरात्र काबाडकष्ट करणारा राकेश दहा वर्षापूर्वी आपल्या बायकोसह पुण्यात आला. काहीही करून, कितीही कष्ट उपसावे लागले तरी बहत्तर पण आता गावाकडे परतायचे ते मनातल्या पूर्ण स्वप्नाने... जिद्दीला पेटलेले हे दांपत्य खानदेशातील नंदुरबार मधल्या एका छोट्याशा खेड्यातून शहराकडे आलेले. शिक्षणाची वानवा, प्रचंड गरिबी, कुपोषण, आरोग्याची समस्या अशी संकटे पाचवीलाच पुजलेली हे दांपत्य मोठ्या उत्साहाने काम करत होते.. मिळेल ते काम आनंदाने करणाऱ्या राकेशने हॉटेलमध्ये वेटर बॉयचे कामे असतील का मोठ-मोठ्या टकूरबंद इमारती बांधताना कामगाराची भूमिका बजावतानाही रात्रीची पहाट केली. त्याची बायको चिंधीही नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करत होती. अगदी थोड्याच दिवसात घरात आनंद पसरला तो लहानश्या आनंदच्या जन्माने, नंतर भुरी जन्माला आली ती सहा वर्षांनी अस ते छोटं कष्टकरी कुटुंब मोठ्या आत्मीयतेने, आनंदाने रहात होते.
        चार पैसे जमा करुन गावाकडे परतावे हे आता फक्त स्वप्नच राहिले. माणूस महानगराच्या आश्रयाला येतो ती स्वप्न घेऊन पण महानगराच्या विशाल काय नगरीत स्वप्न कधी विरून जाते ते कळत नाही. दोन मुलं, बायको यांच्या गरजा पूर्ण करणं राकेश साठी अवघड होत होतं.. प्रचंड महागाई, शिक्षण आरोग्याचा खर्च वाहता वाहता  कमावलेले त्या हवेत कधी संपत होतं तेच कळत नव्हतं...
         आजही भारतासारख्या अनेक विकसनशील देशात अज्ञान, अंधश्रद्धा, गरीबी ,भ्रष्टाचार सारखी अनेक संकटे आ वासून उभी आहेत. वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगती म्हणावी अशी झाली नाही.. जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण अशा अनेक संकल्पना कशाबरोबर खावं हे न कळणारा बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे इथे गल्लीगल्लीत, फुटा फुटावर भेटतील अशी परिस्थिती.... त्यांच्यावरच आज जागतिकीकरणाने मोठा घाला घातला असे म्हणताना जीभही बर्फागत गोठून गेली होती.. सायंकाळी सातच्या सुमारास ऐकलेल्या त्या बातमीने त्याच्या पायाखालची जमीनच निसटली. काय करावे? कुठे जावे? गावाकडे जाऊन करणार काय? इथे थांबून पुढे काय? असंख्य प्रश्न त्याच्या सर्वांगाला चावा घेऊ लागले. कुत्र्याच्या जमावाने एखाद्या बकरीवर हल्ला चढवावा आणि तिला काहीच सुचू नये अशी त्याची अवस्था झाली. महामारी हा शब्द त्याच्यासाठी आज काळ रात्र बनवून गेला. "उद्यापासून संपूर्ण भारत बंद... जनतेने सहकार्य करावे." अशी राष्ट्र प्रमुखांचे वाणी ऐकताच तो सुन्न झाला. आता ही कसली महामारी? एकच प्रश्न त्याला सतावत होता. बंद झालेली अर्थव्यवस्था आता आपल्या जगण्याची दारे तर बंद करणार नाही ना? आता आपल्या बायकोचं.. लेकरांचं काय होणार? या विचाराने त्याची झोप उडाली ती उडालीच..
       हलकेच पहाटे त्याला डोळा लागला आणि छान स्वप्न पडले खूप दिवसांनी त्याला सगळीकडे आनंदच आनंद दिसून आला.. इथला प्रत्येक घटक आनंद व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर आला होता. जंगलातला मोर बेफान होऊन नाचत होता. थोडं पुढे गेल्यावर सोंडेत पाणी घेऊन सशांवर पाणी उडवणारा हत्तीही त्याला दिसला... पक्ष्यांचा किलबिलाट, चिमण्यांची चिवचिव किती किती आनंद होता तिथे.. लांडगे ,अस्वले उड्या मारत होती.. सुर पारंबी चा खेळ मोठ्या आनंदाने माकडीही खेळत होती.. मिठू मिठू बोलणारा पोपट मैनेला खुणावून कोकिळेची कुहू कुहू ऐकवत होता.. टुणुक टुणुक उड्या मारत खारुताईही आनंद घेत होती.. जंगलाचा राजा सिंह राजसभा घेण्यासाठी विस्तीर्ण कातळावरती मोठ्या ऐटीत बसलेला होता. अजगरही झाडावर लोंबकळत पाण्यातल्या मगरीला बोलतवत होते.. सगळीकडे आनंदच आनंद..  परमोच्च आनंद दुसरा तो काय ? हे सर्व डोळ्यात साठवून घ्यावं एवढच त्याला त्याक्षणी दिसत होतं.. किती मज्जा... मज्जाच मज्जा.. "चिंधीला,आनंदला आणि भुरीला आणायला हवं होतं ना ." राकेश मनातच पुटपुटला निदान लहानग्या मुलीला तरी घेऊन यावं म्हणून तो घराकडे परत फिरला.. घराच्या कडे त्याची पावले झपाझप पडु लागली.. आता घरी जाताना त्याला जीराफ आणि झेब्रा ही दिसला.. पण आत्तापर्यंत आनंदाचा आस्वाद घेणारा राकेश घाबरला त्याला खूपच एकटं वाटायला लागलं... त्याला लक्षात आलं माणसे तर कुठेच दिसेना आणि मग तो जोरात धावत सुटला बेफान होऊन कोसळणाऱ्या वळीवाच्या पावसागत.. पळता पळता त्याचा पाय घसरला आणि तो धपकण पडला. आई ग अस विव्हळत उठण्याचा प्रयत्न करु लागला तशी त्याची पापणी उघडली.. डोळे जड झाले होते झोपूनच रहावेसे वाटत होते पण आता खरंच झोप लागणार का? मिटलेले डोळे परत विचारात गुंग झाले. महिनाभर घराच्या बाहेर पडायचे नाही. आहे त्या ठिकाणीच राहायचे.. माणसाला माणूस भेटला की ही महामारी एकमेकाच्या मानगुटीवर वेताळगत बसते हे ऐकून मनही घाबरून गेलं... पण याहीपेक्षा पोटाची आग खूप वेदनादायी.. एकटा असतो तर ठीक पण बायको लेकरांचं काय होणार? या जाणिवेने त्याच्या डोळ्यातून गालावर अश्रू ओघळले...

                                  रणजित कुऱ्हे
               ranjitkurhe0@gmail.com

Comments

  1. परिस्थिती भयानक आहे. अनेक कुटुंब देशोधडीला लागलीत :-(

    ReplyDelete

Post a Comment