दृष्टिकोन

दिवस मावळतीला आला.... दिवसभर काम करून सदानंद थकून गेला होता.. आता घरी जायचं आणि बायकोच्या हातचं पिठलं भाकर खायची ही एकच इच्छा त्याच्या मनात होती. दिवसभर कष्ट करणे आणि सुखाची भाकर संध्याकाळी खाणे हा त्याचा नीतिनियम होता.. सकाळी लवकर उठणे जनावरांचे शेण शेणकुर करून त्यांच्या खालची घाण साफ करायला त्याला मजा यायची..शेणकुर करून झाल्यानंतर दोन गाई , वासरू आणि आपल्या लाडक्या हौश्या आणि नंद्याला वैरण टाकून तो आंघोळीला बसायचा.. आंघोळीला बसण्यापूर्वी हलकेच दोन गाईंचे दूध काढून ठेवण्याच्या कामांमध्ये मंगा त्याला मदत करायची... आंघोळ झाल्यावरती देवाची पूजा करणे आणि सायकलवर टांग मारून डेअरीला विक्रीसाठी दूध घेऊन येणे... दुधाला इतकी फॅट लागली म्हणजे इतका भाव मिळेल... हे गणितही कधीकधी तो जुळवत बसत असे...पण आनंदी असणे आणि त्या क्षणांचा आनंद घेणे हे सदानंद न चुकता करत असे... कोणत्याही प्रकारचा खोटा गाजावाजा न करता हे काम करायला त्याला मजा यायची.. दूध घालून आल्यावर  घरी येणे परत जनावरांना चारा टाकणे आणि कामाला परत लागणं... शेतीच उरलेल प्रत्येक काम मग ते कोणतही असो करताना त्याच्या चेहऱ्यावर फक्त काम केल्याचा आनंद तो असतो.. आणि एवढं सर्व करून हाताला मिळणाऱ्या अगदी थोड्याशा किमतीतही तो सुखी असतो... आता हेच बघा ना दिवसभर काम करून घरी मंगाच्या हाताने चुलीवर केलेल्या गरमागरम भाकर आणि पिठल्याची त्याला आठवण येत आहे....

+++++++++++++++++++++++++++++

             अर्थराजच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता... गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवणे कामी त्याने स्वतःला वाहून घेतले होते..सकाळ उजाडली की त्याच काम सुरु व्हायचं ..आत्ता हे काम सुरु व्हायचं असं म्हणण्यापेक्षा तो नसलेल्या प्रश्नांना उभं करायचा असं म्हटलं तरी वावगं ते ठरणार नव्हतं...बिचाऱ्या बायका त्यांच्या ठायी असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या त्याच्याकडे घेऊन यायच्या आणि त्यांना क्षणिक न्याय मिळायचा हे काही खोट पण नव्हतं ..सुरवातीला मोठया उत्साहाने त्याने महिलांचे अनेक प्रश्नही मार्गी लावले होते..मोठं मोठ्या लोकांना भिडून त्याने चुटकीसरशी महिलांचे प्रश्न खऱ्या आत्मीयतेने मांडून त्यांना न्याय मिळवून दिला होता .अर्थराजच्या बोलण्यात स्वतःच्या  महतीचे पोवाडे इतके असायचे की ते ऐकताना समोरच्याला कंटाळा यायचा पण त्याच बोलणं ते काही संपायच नाही....उत्साह,काम करण्याची दिखाऊ धडपड आणि खोटी का असेना पण दुसऱ्याला आपलं करून त्यांना लुटण्याचा बाबतीत त्याचा कोणीच हात पकडू शकत नव्हता..नसलेल्या मुद्द्यांना हात घालून,प्रश्न निर्माण करून त्यात स्वतःचा स्वार्थ साधायचा हि त्याची काम करण्याची पद्धत इतक्या वर्षात कशी बदलली त्याचा मागचा इतिहास बघताना जाणवलं की ; खरं तर  पूर्वी  साधा आणि संवेदनशील माणूस होता ...महिला वर्गाच्या अनेक समस्या सोडवत त्याने स्वतःला एका उंचीवर नेल्यावर काळाच्या ओघात त्याला जाणवलं की पैशाशिवाय काही खरं नाही आणि मग तत्वाचे राजकारण बाजूला सारून त्याने सुरु केलं पैशाचे राजकारण..न संपणार ..तुमचा हा मुद्दा मी सोडवतो..तुला हे मिळवून देतो....तुला काय हवं ते सांग?पुढच्या वेळपर्यंत मी तुला ते मिळवून देणारच..असं आश्वासन त्यानं दिल आणि हळूच म्हटलं ते मिळवून देण्यासाठी तुला इतके पैसे द्यावे लागतील ..तू मला तेवढे पैसे दे मी तुझ काम केलंच म्हणून समज..आत्ता बिचारी ती ...तिने पैसे जवळ नसताना दुसरीकडून घेऊन त्याच्या हातात 1700 रुपये ठेवले आणि ती सुखात घरी गेली..ह्या गोष्टीला आत्ता 2 महिने उलटून गेले आणि खरच तिला न्यायही मिळाला .खरं तर ते काम तसेच झालं पण....पैशाने काहीही होऊ शकत ही भ्रामक कल्पना आज सत्यात उतरली होती..ती खुश होती कारण तीच काम झालं होतं अन त्याची पावले खुशीत दारूच्या दुकानाकडे वळली ..न संपणाऱ्या प्रवासावर...नेहमीप्रमाणे ...आजही तो खुश होता..

                                                                @रणजित

Comments